गृहनिर्माण संस्था नोंदणीचे फायदे 

1
7378
Read in English

गृहनिर्माण संस्था नोंदणीचे (Housing Society Registration) फायदे 

सदनिका, रो हाऊस, दुकान घेणाऱ्या प्रत्येकाने त्यांच्या हक्काबाबत जागरूक असलं पाहिजे, त्याला माहित असायला असाव्या अश्या अनेक गोष्टींपैकी गृहनिर्माण संस्था नोंदणीचे फायदे या लेखातून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. वाचकांनी कात्रण करून माहिती इतरांना सुद्धा पाठवा. 

गृहनिर्माण संस्था नोंद कधी करावी?

प्रत्येक गृहनिर्माण प्रकल्प उभा करताना बिल्डरच्या अनेक जबाबदाऱ्या असतात, त्यापैकी एक जबाबदारी म्हणजे गृहनिर्माण संस्था नोंदणी करणे ही आहे. गृहनिर्माण प्रकल्पातील किंवा इमारतीतील एकूण सदनिकांच्या ५१ टक्के सदनिकांची विक्री झाली कि गृहनिर्माण संस्था नोंदणी पुढील ४ महिन्यात नोंदणी करणे बिल्डरवर बंधनकारक असते. बांधकाम सुरु असताना सुद्धा गृहनिर्माण संस्था नोंदणी करता येते. तसेच भोगवटा दाखला प्राप्त झाला नसला तरीही गृहनिर्माण संस्था नोंदणी करता येते. शक्य तितक्या लवकर गृहनिर्माण संस्था नोंदणी करून सदनिकाधारकांच्या हिताचे असते. गृहनिर्माण संस्था नोंद झाली म्हणजे बिल्डर त्याच्या इतर जबाबदारीतून मुक्त झाला असे होत नाही. बिल्डर मोफा कायदा आणि रेरा कायद्यातील तरतुदींना बांधील आहे.

किमान किती सदनिकांची गृहनिर्माण संस्था नोंदणी होते?

ज्या गृहनिर्माण प्रकल्पात केवळ  ५ सदनिका आहेत त्या ठिकाणी सर्व ५ सदनिकाधारक एकत्र येऊन गृहनिर्माण संस्था नोंदणी करू शकतात. किमान पाच किंवा प्रकल्पातील एकूण सदनिकांच्या  ५१ टक्के सदनिकाधारक एकत्र येऊन संस्था स्थापन करू शकतात.

एकाच प्रकल्पात अनेक इमारती असल्यास गृहनिर्माण काय करावे?

जसजश्या इमारती पूर्ण होतील तसतशा प्रत्येक इमारतीची वेगवेगळी गृहनिर्माण संस्था नोंद करता येते किंवा पूर्ण होणाऱ्या इमारतीतील सदनिकाधारकांना नोंदणीकृत संस्थेत सभासद करून घेणे उत्तम पर्याय आहे. संपूर्ण प्रकल्पात एकच नोंदणी कृत संस्था असणे कधीही उत्तम, एकपेक्षा अधिक गृहनिर्माण संस्था असल्यास गृहनिर्माण संघ स्थापन करून सामायिक सोइसुविधांची मालकी व व्यवस्थापन गृहनिर्माण संघ स्थापन करून करावे लागते.

गृहनिर्माण संस्था नोंदणी करण्याचे फायदे: लवकरात लवकर गृहनिर्माण संस्था स्थापन करणे अत्यंत उपयोगाचे आणि फायद्याचे आहे. त्यापैकी काही फायदे पाहू.

  •  गृहनिर्माण संस्था म्हणजे सदनिका धारकांची संघटना आहे. संघटन हीच शक्ती असते, एकी हेच बळ असते. गृहनिर्माण संस्था हे सदनिकाधारकांना एकत्र येऊन बिल्डरकडून सर्व हक्क, सेवा सुविधा संपादित करण्यासाठी एक राजमार्ग असतो. बिल्डरला गृहनिर्माण संस्था नोंद करू न देता सदनिकाधारकांना एकत्र येऊ द्यायचं नसत, त्यांना एकटं पडायचं असत त्यामुळे गृहनिर्माण संस्था नोंदणी करून दिली जात नाही.
  •  गृहनिर्माण संस्था नोंदणी झाली कि ४ महिन्यात जमीन संस्थेच्या नावावर करून घेता येते. जमीन नावावर झाल्यास बिल्डरला बांधकाम आराखड्यात बदल करता येत नाही. वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक (FSI) वर बिल्डरला हक्क दाखवता येत नाही तसेच वाढीव बांधकाम करण्यापासून रोखणे सोपे होते.
  •  पार्किंग वाटप करणे हि गृहनिर्माण संस्थेची जबाबदारी आहे. पार्किंग विक्री किंवा वाटपातून बिल्डर अनेक सदनिकाधारकांची फसवणूक करतात. ती फसवणूक टाळता येते.
  •  सदनिका विक्री करायची असल्यास बिल्डर ना हरकत दाखल्यासाठी लाखो रुपये उकळते, गृहनिर्माण संस्था नोंदणी झाल्यास हि लूट रोखता येते.
  •  बिल्डर जर त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण करत नसेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाईसाठी सर्वाना वर्गणी काढणे, निर्णय घेणे सोपे होते.
  •  गृहनिर्माण संस्था नोंदणी लवकर झाल्यास बिल्डरला मेंटेनंनससाठी रक्कम द्यावी लागत नाही. बिल्डर जेंव्हा मेंटेनन्स साठी रक्कम घेतो ती रक्कम मनमानी पद्धतीने खर्च करतो. गृहनिर्माण संस्था स्थापन झाल्यास काटकसर करून मेंटेनन्ससाठी होणारा खर्चाची बचत करता येते. तसेच जर स्थानिक प्राधिकरणाने पाण्याची व्यवस्था केली नसेल तर सुरुवातीपासून पाण्यावर होणार खर्च बिल्डरकडून वसूल करण्यासाठी आवश्यक कागदपत्र तयार होतात, वसुली करणे करणे शक्य होते.
  •  प्रकल्प रेरा नोंदणी असेल आणि जर बिल्डर प्रकल्प पूर्ण करण्याच्या परिस्थितीत नसेल तर गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून स्वतः प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मदत होते.
  •  गृहनिर्माण संस्था नोंदणी असल्यास सुरुवातीपासूनच सदनिकाधारकांकडून मेंटेनन्स गोळा करणे सोपे जाते तसेच ते सदनिकाधारक मेंटेनन्स देत नाहीत त्यांच्याकडून वसुली करणे सहज शक्य होते.
  •  विक्री न झालेल्या सदनिकांच्या मेंटेनन्स बिल्डरकडून वसुल करता येतो. Click here to read more.

बिल्डर जर मेंटेनन्स मागत असेल तर मेंटेनन्स न देता गृहनिर्माण संस्था स्थापन करण्याबाबत आग्रह धरा बिल्डर जर गृहनिर्माण संस्था स्थापन करून देण्यास टाळाटाळ करत असेल तर ५१ टक्के सदनिकाधारकांनी एकत्र येऊन बिल्डरच्या सहकार्याशिवाय गृहनिर्माण संस्था नोंदणी करून घ्यावी. अनेक ठिकाणी सदनिकाधारक बिल्डरने काम अपूर्ण ठेवले म्हणून संस्था नोंदणी करण्यास किंवा संस्थेचे कामकाज चालवायला घेण्यास टाळाटाळ करण्याची आडमुठी भूमिका घेतात त्यामुळे त्यांचे प्रचंड मोठे नुकसान होते. बिल्डरने अपूर्ण ठेवलेल्या कामांबाबत बिल्डरला कायदेशीर नोटीस पाठवून सक्षम न्यायालयात दाद मागून न्याय मिळवता येतो.

गृहनिर्माण संस्था नोंदणी करून बऱ्याच अंशी निश्चिन्त व्हा!

गृहनिर्माण संस्था नोंदणी (Housing Society Registration) करण्यासाठी Dear Society ला आजच संपर्क करा.

Call: +91 9175733957

Website: www.dearsociety.in/

#WeRunSocieties

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here